Crop loan : शेती मालाला योग्य भाव येईपर्यंत मालाची साठवणूक करण्यासाठी शेतकरी आपली उत्पादने वखार महामंडळाच्या गोदामात ठेवतात. अशा मालाच्या तारणावर, मूल्याच्या 70 टक्के इतका कर्जपुरवठा केवळ 9 टक्के व्याजदराने करण्याचे धोरण राज्य सहकारी बँकेने आखले आहे.अशी माहिती बँकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी पत्रकार परिषदेत सांगितली.
राज्यातील शेतकऱ्यांनी वखार महामंडळाच्या माध्यमातून ठेवलेल्या मालावर केवळ 4 तासात कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी, राज्य बँकेने ब्लॉक चेन प्रणालीद्वारे सुरू केलेल्या यशस्वी योजनेची तसेच राज्य शासन पुरस्कृत स्मार्ट कॉटन या प्रस्तावित कर्ज योजनेची माहिती पत्रकार परिषदेत दिली. यावेळी राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, वखार महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिपक तावरे, आयएएस, ॲडव्हायझर व नोडल ऑफिसर अजित रेळेकर तसेच ब्लॉक चेन प्रणालीचे आशिष आनंद उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते.
100 कोटी रुपयांचे यशस्वी कर्ज वाटप
या योजनेसाठी राज्य बँकेला, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ व व्हर्ल कंपनी व जागतिक बँक अर्थसहाय्यित बाळासाहेब ठाकरे, कृषि ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट प्रकल्प) अंतर्गत विकसीत केलेल्या ब्लॉक चेन संगणक प्रणालीचे सहकार्य लाभले आहे. आजतागायत या योजनेअंतर्गत प्राफ्त झालेल्या 4,543 अर्जाद्वारे बॅंकेने रु.100 कोटी रुपयांचे यशस्वी कर्ज वाटप केले आहे.